महाराष्ट्राच्या मातीने अनेक पराक्रम जन्माला घातले. त्यात स्त्री -पुरुष असा भेद करताच येणार नाही. त्यातील एक लखलखते नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज’!!! अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेचे पूज्यस्थान!
अशा शुद्ध बीजापोटी जन्मलेली फळे रसाळ, गोमटी असणारच हे आपण संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या उदाहरणावरून जाणून घेवू शकतो पण शिवरायांच्या मुली देखील तेवढ्याच पराक्रमी आणि कर्तबगार होत्या हे तुम्हाला माहिती आहे का?
इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या या सहा शलाकांविषयी कोणालाच फारसे माहिती नाही,की त्यांच्याबद्दल फारशी कुठे नोंद देखील नाही. चला तर मग या शलाकांचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करु.
शिवरायांना आठ पत्नी होत्या. त्यापैकी सईबाई यांना तीन, सोयराबाई यांना एक आणि सगुणाबाई यांना दोन कन्या होत्या. सखवारबाई उर्फ सखुबाई, राणूबाई,अनामिका उर्फ अंबिकाबाई या साईबाईंच्या मुली तर दीपाबाई या सोयराबाईंच्या कन्या तसेच राजकुंवरबाई आणि कमलाबाई या सगुणाबाईंच्या कन्या होत्या.
या सार्याजणींचे विवाह आपल्या पराक्रमी सरदारांशी करून महाराजांनी नाती जोडण्याबरोबरच माणसे जोडण्याचे महत्वाचे कार्य केले. ज्याचा स्वराज्य रक्षणासाठी मोठा उपयोग झाला.
सखुबाई निंबाळकर :
शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ कन्या सखुबाई यांचा जन्म इसवी सन १६४८ मध्ये झाला. त्यांचा विवाह फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ पुत्र महादजी नाईक निंबाळकर यांचेशी १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी पुण्यात लावून दिला. या लग्नाला स्वतः सईबाई राणीसाहेब हजर होत्या.
फलटणचे नाईक निंबाळकर यांचे घराणे अत्यंत शौर्यशाली व पराक्रमी असे होते.
सखुबाई राणीसाहेब या सर्वात ज्येष्ठ कन्या असल्यामुळे शिवाजीराजांच्या त्या अत्यंत लाडक्या होत्या.
नाईक-निंबाळकर यांच्या घरांशी भोसले यांचे पूर्वापार संबंध चालत आले होते. शहाजीराजांचे, जिजाऊ साहेबांचे व शंभूराजे या तिघांचेही आजोळ फलटणचे नाईक निंबाळकरांकडे होते,
‘वनंगपाळ बारा वजीराचा काळ’ अशी निंबाळकर घराण्याची ख्याती होती. शिवाजी राजांचे जावई महादजी नाईक निंबाळकर यांनी स्वराज्याच्या कामी आपल्या सासर्यांना उत्कृष्ट सहाय्य केले होते.
पुढे संभाजीराजांना औरंगजेबाने पकडून नेते वेळी महादजी नाईक निंबाळकर मोगलांच्या हाती लागले. महादजीराजे यांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले काही दिवसांनी महादजी नाईक निंबाळकर यांचा गाॅल्हेरच्या कैदेतच मृत्यू झाला. नंतर त्यांच्या पत्नी सखुबाई राणीसाहेब फलटणला सती गेल्या.
सखुबाई राणीसाहेब यांची समाधी राॅयल छत्रीबाग येथे आहे. सखुबाई राणीसाहेब यांना शिवाजी महाराजांनी पुरंदर तालुक्यातील वाल्हे हे गाव चोळी बांगडीसाठी इनाम म्हणून दिले होते.
२. राणूबाई जाधव :
राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच. त्यांना अगदी लहान वयातच वडिलकीची शिकवण झाली होती. आपल्या तीन बहिणींच्या पाठीवर आपला भाऊराया जन्माला आलाय हा त्यांच्यासाठी मोठा आनंद होता.
शंभूराजे लहान असताना प्रत्येकवेळी राणूबाई शंभूराजांना त्यांच्या मांडिवर घेऊन झोपवत असे. त्या शंभू बाळासाठी स्वतः अंगाई गायच्या. राणूबाई दिसल्या नाहीत तर शंभूबाळ खुप कासावीस होत.
जन्मदाती आपल्याला सोडुन गेली आहे, आपला भाऊ खुप लहान आहे, त्याला आईची आठवण येऊ नये म्हणून राणूबाई शंभूबाळाला स्वतःच्या मांडीवर खेळवत असे.
महाराज मोहिम करून जेव्हा गडावर परतायचे आणि आल्यावर महाराज आऊसाहेबांच दर्शन घ्यायचे.. त्यानंतर मात्र महाराजांची नजर शंभू बाळाला शोधायची.आणि शंभूबाळाला शोधत असताना जेव्हा महाराज शंभूबाळाला राणुबाईंच्या मांडिवर निवांत झोपलेले पहायचे तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर मोठ समाधान यायच.
राणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या. त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असत. राणूबाई देखील स्वतः संस्कृत भाषेत पारंगत असल्याचा खुप ठिकाणी उल्लेख आढळतो.
रितीरिवाजानुसार राणूबाईचे लग्न सिंदखेडराजा चे कृष्णाजी जाधवराव यांच्याशी झाला. त्या सासरी गेल्या असल्या तरी त्यांच लक्ष कायम शंभूराजांवर राहिले शेवटपर्यंत त्या शंभूराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
३. अंबिकाबाई राजेमहाडीक :
शिवरायांच्या तिसर्या कन्या अंबिकाबाई या त्यांच्याप्रमाणेच मुत्सद्दी आणि राजकारण चतुर होत्या. त्यांचा जन्म १६५४ मध्ये झाला होता.
शिवरायांचे मुख्य सरदार असलेल्या महाडच्या हरजीराजे महाडीक तारळेकर यांच्याशी त्यांचा विवाह १६६८ मध्ये झाला होता.
महाराजांच्या कर्नाटक मोहिमेत हरजीराजे यांनी थोर पराक्रम गाजवला होता. त्यांना ‘प्रतापराव’ ही पदवी प्राप्त होती.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिकांनी मदत केली.
परसोजींच्या सात मुलांपैकी हरजीराजेंना शिवाजी महाराजांनी आपली कन्या अंबिकाबाई देऊन सन १६६८ मध्ये सोयरीक केली. संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटकसह दक्षिण प्रांत औरंगजेबच्या झंझावाती आक्रमणापासून वाचविला.
४. दिपाबाई उर्फ बाळीबाई :
शिवराय आणि सोयराबाई यांची कन्या असलेल्या दीपाबाई यांचा उल्लेख जरी शिवचरित्रात येत असला तरी त्यांच्याबद्दल फारशी माहिती ऐतिहासिक कागदपत्रात देखील नाही.
शिवरायांच्या हेर खात्यातील एक प्रमुख सरदार विश्वासराव उर्फ विसाजीराव यांच्याशी त्यांचा विवाह झाल्याचा उल्लेख एक दोन ठिकाणी आढळतो. बाकीचा त्यांचा इतिहास अज्ञात आहे.
५. राजकुवरबाई शिर्के :
सूर्यवंशी क्षत्रिय राजेशिर्के घराण्याचे रामराज्य काळापासूनचे संदर्भ आहेत. प्रभू रामचंद्र निजधामास गेल्यानंतर कालांतराने काही वर्षांनंतर राजेशिर्के ह्यांनी आपली प्रथम गादी हस्तिनापुरी येथे स्थापित केली. शिर्के घराण्यातील पूर्वज दिल्ली तख्तावर राज्य करीत होते. त्यांना ‘कुटर बादशाह’ असे म्हणत.
इ.स. ५४० पासून त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे. चालुक्य राजाशी त्यांचे घट्ट राजकीय संबंध होते व त्यांच्या अधिपत्याखालचा काळ सुवर्णकाळ समजला जायचा.
याच घराण्यातील गणोजी राजेशिर्के यांचा विवाह राजकुंवरबाई यांच्याशी झाला होता. शिरकाण,महाड, कोकण – रायगड ते दक्षिणेला सावंतवाडीपर्यंत आणि असा विशाल प्रदेश हे राजेशिर्के यांचे राज्य होते. त्यांचे प्रचंड मोठे आरमार होते.
इसवी सन अंदाजे ११०० ते १४०० दरम्यान त्यांच्याकडेच रायगड होता. त्यावेळी स्थापन केलेले शिरकाई देवीचे मंदिर आजही तेथे आहे शिवाजी राजे भोसले ह्यांनी गणोजीराजे शिर्के यांना जावई करून घेतले.
६. कमलाबाई पालकर :
सगुणाबाई यांच्या कन्या असलेल्या कमलाबाई यांचा विवाह स्वराज्याचे सरनौबत असलेले नेताजी पालकर यांच्या मुलाशी म्हणजेच जानोजी पालकर यांच्याशी झाला असल्याचे दाखले आहेत.
नेताजींना बाटवून त्यांचा मुहंमद कुलीखान करण्यात आला, त्यानंतर तब्बल नऊ वर्षानी स्वराज्यात परतलेल्या नेताजींना पुन्हा स्वधर्मात घेताना त्यांचे धर्मांतर सर्वांना मान्य व्हावे यासाठी शिवरायांनी आपल्या मुलीचा विवाह नेताजींच्या मुलाशी करून दिला होता.
मित्रांनो इतिहासाच्या गर्भात अशी कितीतरी अबोल पाने लपली आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला आजही फारशी माहिती नाही. पण तरीही ज्यांनी आपले सर्वस्व आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी खर्ची घातले अशा व्यक्तींची आठवण ठेवून आपण त्यांचे ऋण मानले पाहिजेत.
आपल्या पित्याइतक्याच कर्तबगार असणार्या आणि तरीही इतिहासाने गडप केलेल्या या शिवकन्याना मानाचा मुजरा!